Thursday, 13 November 2008

घेता

देना-याने देत जावे
घेना-याने घेत जावे

हिरव्यापिवळ्या माळावरुन
हिरवीपिवळी शाल घ्यावी
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी

वेड्यापिश्या ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्याशा भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देना-याने देत जावे
घेना-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देना-याचे हात घ्यावे !

- विंदा करंदीकर
( संहिता )

No comments: