Sunday, 23 November 2008

जालियनवाला बाग

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषित, अजुनी शब्दांचे
मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष -
"प्रेम, शान्ति अन क्षमा यांमध्ये वसतो परमेश !"
आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातांत
नि:शस्त्रांच्या रक्तामांसामध्ये नाहतात
मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलांबायाकांत
जगजेत्यांच्या पराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !
पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशिल देवा, तू अपुले खास
असेल ही वा सैतानाची प्रभुवरी मात
एक जखम अन नवीन येशू, तुझ्या काळजात !

- कुसुमाग्रज
( विशाखा )

Thursday, 13 November 2008

घेता

देना-याने देत जावे
घेना-याने घेत जावे

हिरव्यापिवळ्या माळावरुन
हिरवीपिवळी शाल घ्यावी
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी

वेड्यापिश्या ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्याशा भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देना-याने देत जावे
घेना-याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देना-याचे हात घ्यावे !

- विंदा करंदीकर
( संहिता )