Sunday, 22 February 2009

मी वाचवतोय.....

हाकेतून हद्दपार होतेय आई
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई

हरवत चाललाय किराणा आणि भुसार
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर
लोहाराचा भाता आणि कुंभाराचा आवा
निघून चाललाय गावगाड्यासोबत मुकाट

कल्हईची झिलई विस्तवासोबत निघून गेली
मागच्या धगीवर रटरटणारी आमटी
राखेसहित दुरावत गेली गँसच्या शेगडीवर

बोलाचालीतून निघून चाललीय माझ्या आईची बोली
सुटीत आता खेळत नाहीत मुलं
विटीदांडू आणि लगो-या

थांबून गेलाय त्यांचा दंगा,
आट्यापाट्या आणि पिंगा
परक-या मुली खेळत नाहीत आता
आधीचे मातीतले खेळ

पोरं आता दंग असतात दूरदर्शनच्या चँनेलवर
बघत क्रिकेटची मँच
आणि उलघडत क्राईम - थ्रिलर

लिहीते हात आता राहीले नाहीत लिहीते
शब्द बापुडे केवळ वारा
तसेच विरून जातायत

मी वाचावातोय माझी कविता
आणि माझी आई
आणि माझी बोली
आणि माझी भूमि
कवितेसोबत

- सतीश काळसेकर
('साधना' - दिवाळी २००५)